याच निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचे सुद्धा नाव नमूद करण्यात आले आहे. शरद पवार यांचे पत्रिकेत नाव नसल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा बराच बोलबाला राज्यात सुरु आहे. अशातच विरोधकांनी याच योजनेवर निवडणुकीची योजना असे म्हणत टीकेची झोड उठवली होती. पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात सर्व स्थानिक आमदार आणि खासदारांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
शुभारंभा आधीच पैसे बहीणींच्या खात्यात!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास बुधवारपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, १४ ऑगस्ट अर्थात, बुधवारपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ‘एक्स’द्वारे ही माहिती दिली. तसेच त्यांनी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही जोडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यास दुजोरा दिला असून प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वीची ही रंगीत तालीम असून, जमा झालेले हे पैसे परत घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.