उत्तर विधानसभा मतदारसंघात बीजेपीचा आमदार निवडून येण्याआधी अनेक वर्षे काँग्रेसचे आमदार होते, त्यामुळे काँग्रेसचे नेते सुद्धा दावा करत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबूराव चाकोते यांचे नातू सुदीप चाकोते यांनी उत्तर सोलापूर मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सुदीप चाकोते हे काँग्रेसच्या सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. सोलापुरातील उत्तर सोलापूर मतदारसंघाची चर्चा राहुल गांधी यांच्या दरबारात होत आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा राहुल गांधीच सोडवतील अशी अपेक्षा उत्तर सोलापूरकरांना लागली आहे.
काँग्रेस अन् राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच
उत्तर सोलापूर मतदार संघात २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपने दारुण पराभव केला होता. या मतदारसंघात लिंगायत समाज, पद्मशाली, तेलगू भाषिक, मुस्लिम, मराठा दलित मतदारांची मतदारसंख्या मोठ्या संख्येने आहे. त्यानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटातील पद्मशाली समाजाचे आणि ज्येष्ठ राजकीय नेते महेश कोठे यांनी उघडपणे जाहीर केले आहे. काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे पुतणे सुदीप चाकोते यांनी काँग्रेसकडे उत्तरमधूनच विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष कार्यालयात जंगी मिरवणुकीने जाऊन पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस मध्ये रस्सीखेच सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्यावरून शरद पवारांची डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादी दावा करत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचारास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीच्या ११ जागांचा अंदाज
महाविकास आघाडीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ११ जागांबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (पवार गट) यांच्याकडे पाच विधानसभा मतदारसंघ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा, माढा, मोहोळ, करमाळा या तालुक्यात राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठींकडे ताकद लावली आहे. काँग्रेसकडे अक्कलकोट, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर. शिवसेना ठाकरे गटाकडे सांगोला आणि बार्शी हे मतदारसंघ येतील अशा अंदाज वर्तवला जात आहे. दक्षिण सोलापूर मतदार संघावर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होऊ शकते कारण यापूर्वी दक्षिण सोलापुरात शिवसेनेच्या आमदारांनी विजय प्राप्त केला होता. ठाकरे गटाच्या इच्छुक नेत्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (पवार गट) आणि काँग्रेसच्या नेत्यांची शक्ती पणाला लागली आहे.
दोन मतदारसंघात लिंगायत समाज ठरणार गेम चेंजर; लिंगायत चेहऱ्याला सोनेरी संधी
दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत सामजाची मतदारसंख्या मोठ्या संख्येने आहे. राष्ट्रवादी (पवार गट), काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांना लिंगायत चेहरा देणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सुदीप चाकोते लिंगायत समाजाचे आहेत त्यामुळे काँग्रेसकडे मोठा लिंगायत उमेदवार आहे. उत्तर सोलापूरमध्ये सध्या भाजपचे आणि लिंगायत समाजाचे विजयकुमार देशमुख २० वर्षांपासून आमदार आहेत. त्यामुळे उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समोर लिंगायत उमेदवार दिला, तरच काँग्रेसला सोनेरी दिवस आहेत, अन्यथा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस भाजपसमोर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की येणार आहे.
काँग्रेस आणि भाजप असे ८ वेळा उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून लिंगायत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. उत्तर सोलापुरप्रमाणे दक्षिण सोलापुरात लिंगायत समाज गेम चेंजर ठरणार आहे. दक्षिण सोलापुरात लिंगायत समाजाची मतदारसंख्या लक्षणीय आहे, म्हणून दक्षिण सोलापुरात लिंगायत नेत्यांचा बोलबाला राहणार आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेवर सोलापूर जिल्हा असल्याने लिंगायतधर्मीय नागरिक जास्त वास्तव्यास आहेत.
सोलापुरातील नेता राहुल गांधींचा निवटवर्तीय
राहुल गांधी हे सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रमुख आहेत. सोलापुरातील सुदीप चाकोते हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सुदीप चाकोते हे किमान पंधरा दिवसांत एकदा तरी राहुल गांधींसोबत दिसतात. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावेळी सुदिप चाकोतेंचं पारडे जड होत. सोलापूर शहर उत्तरची जागा काँग्रेसकडे येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. लिंगायत समाजातील मोठे नेतृत्व आणि राहुल गांधींसोबतच्या जवळीकतेमुळे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भारतीय जनता पार्टीसमोर मोठे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.