अशातच दिवसभरात हीच बातमी चर्चेत असतानाच आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. थोरात यांच्यासोबतच प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांचीही याच समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्ता जाहीर केल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नियुक्ता केल्या असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
याआधी, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आरिफ नसीम खान नाराज झाले होते अशी कुजबूज सुरु होती. अशातच पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याबद्दल नाराज आहोत अशी भावना खुद्द नसीम खान यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. पक्षाच्या प्रचार समितीचा आणि काँग्रेसच्या पुढील टप्प्यातील स्टार प्रचारकपदाचा नसीम खान यांनी राजीनामा दिला होता, त्यांची हीच नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना नवी जबाबदारी दिली असे म्हणता येईल.
काँग्रेसचे विधानसभेसाठी काय ठरले?
आगामी विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अमरावतीत बैठक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले,महाविकास आघाडीत घटक पक्षांत कुणाला किती जागा मिळणार हे अजून ठरलेले नाही, लवकरच याचा निर्णय होईल. हे करताना आजवर ही जागा कोण लढवत आले यापेक्षा कुणाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे पाहिले जाणार आहे. जागा वाटपासाठी मेरीट हाच निकष राहील, असा निर्णय बुलढाण्यातील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करताना मुंबईत बसून निर्णय घेतले जाणार नाही. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.