ज्याच्या जास्त जागा, त्याचा CM; ठाकरेंनी मविआच्या सभेत सांगितला सुत्रातील गंभीर धोका

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा त्याला पाठिंबा असेल, अशी थेट भूमिका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली. महाविकास आघाडीच्या प्रचाराला मुंबईतून सुरुवात झाली. षणमुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रचारास सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का, त्यांच्या नावाला दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा असणार का, यावर अनेक दिवस चर्चा सुरु आहे. तो धागा पकडत मुख्यमंत्री कोण होणार ते आम्ही आमचं बघू. आज शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण इथे आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा. मी आजच त्याला पाठिंबा देतो, असं थेट आव्हानच ठाकरेंनी मित्रपक्षांना दिलं.
Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यासाठी ठाकरेसेना आग्रही आहे. उद्धव यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. ठाकरेंनी शरद पवारांसोबतही चर्चा केली. पण त्यांना मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. आधी निवडणूक निकाल येऊ दे. मग मुख्यमंत्रिपदाचं पाहू, असा मेसेज ठाकरेंना देण्यात आला.

ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना काँग्रेसकडून सांगण्यात आला. त्यावर उद्धव यांनी मुंबईतील जाहीर भाषणावर भाष्य केलं. ‘आमची भाजपसोबत युती होती. तेव्हाही जागावाटपासाठी बैठका व्हायच्या. जागांसाठी रस्सीखेच व्हायची. ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री अधिक सूत्र ठरायचं. पण यामध्ये एक गंभीर धोका असतो. दुसऱ्याच्या जागा जास्त आल्यास त्याचा मुख्यमंत्री होईल म्हणून मग एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न होतात. त्याचा फटका बसतो,’ असा धोका ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सभेत सांगितला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर हल्ला चढवला. ‘लाडकी बहीण योजना जाहीर केली. पण त्यासाठी पैसे कुठे आहेत,’ असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. परदेशातला काळा पैसा भारतात येणार होता. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येणार होते. मग ते अचानक पंधराशे कसे काय झाले, असा प्रश्न ठाकरेंनी केला. सरकार पाडायला ५० खोके, मग बहिणींना १५०० रुपये का, असाही सवाल त्यांनी केला.

Source link

maha vikas aghadiMaharashtra politicsUddhav ThackerayUddhav Thackeray Speechउद्धव ठाकरे भाषणउद्धव ठाकरे भाषण लाईव्हउद्धव ठाकरे मुंबई भाषणमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment