मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे, असेही महापालिकेने स्पष्ट केले. अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सुमारे १२ हजार २०० कोटी रुपयांच्या आणि २९ किमी अंतराच्या या प्रकल्पात २२ स्थानके आहेत. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागांतून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः सन २०२९पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ अंदाजे ६.४७ लाख प्रवाशांना मिळणार आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
हा निर्णय ठाणे शहरासाठी ऐतिहासिक आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्यातील समन्वयामुळे या प्रकल्पाला वेग येईल. या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय शहरे विकासमंत्री मनोहरलाल खट्टर, तत्कालीन केंद्रीय शहरे विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांचे आभार मानले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
खर्च : १२ हजार २०० कोटी
मार्ग लांबी : २९ किमी, त्यापैकी २६ किमी उन्नत, तीन किमी भूमिगत
स्थानके : २२, त्यापैकी २० उन्नत आणि दोन भुयारी
२०२९पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
शहरातील विविध भागांशी थेट रिंग मेट्रो मार्गाने प्रवास शक्य