‘महामेट्रो’च्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो ‘मार्गिका-१’चा विस्तार अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानच्या विस्तारित मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. स्वारगेट-कात्रज दरम्यानच्या मार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता गृहीत धरून महामेट्रोने काही दिवसांपासून या मार्गावर माती परीक्षणाचे (सॉइल टेस्टिंग) काम सुरू केले होते. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत मेट्रोच्या या विस्तारित मार्गिकेला मान्यता देण्यात आली.
हा मार्ग का महत्त्वाचा?
— कात्रजहून स्वारगेट, मध्यवर्ती शहर, कोथरूड, रामवाडी असा सर्व भाग जोडला जाणार
— कात्रजच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड, निगडीपर्यंत जाणे शक्य
— हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा कात्रजच्या नागरिकांना होणार
पुढील प्रक्रिया काय?
— भुयारी मार्गासाठी महामेट्रो निविदा मागविणार
— त्याद्वारे कंत्राटदाराची निवड करून टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) मेट्रोसाठी बोगद्याचे खोदकाम
— स्टेशन्स आणि इतर पूरक कामे यासाठीचे बांधकाम त्यासोबतच केले जाणार
प्रस्तावित स्टेशन्स
— मार्केट यार्ड (गुलटेकडी)
— पद्मावती
— कात्रज
स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोचे अंतर
५.४६ किमी
२,९४६ कोटी रुपये
या मार्गासाठी अपेक्षित खर्च
२०२९
मार्ग कार्यान्वित करण्यासाठी मुदत
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी पुण्याच्या विकासाबाबत मोदी सरकारची कटिबद्धता सिद्ध करणारी आहे. या मंजुरीमुळे कामाला वेग येणार असून दक्षिण पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर कात्रज ते निगडी हे दोन महत्त्वाची टोके मेट्रोने जोडली जाणार आहेत. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री