राज्य शासनाने सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र जाहीर केले आहे. या केंद्राची प्रस्तावित जागा दोन वेळेस बदलण्यात आली आहे. डोईफोडा आणि कोटनांद्रा (ता. सिल्लोड) या गावातील शासकीय जमिनीवर केंद्र उभारणीचा प्रस्ताव आहे. ही जागा निश्चित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने समिती नेमली होती. शासकीय जमीन शेतकरी कसत असल्याने विरोध झाला. शिवाय, गावालगत संशोधन केंद्र उभारणीस विरोध करण्यात आला आहे. संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीने त्याबाबत ठराव घेतला होता. ही शासकीय जमीन सामाजिक वनीकरण विभागाची आहे. जमिनीचे हस्तांतरण रखडल्यामुळे केंद्र उभारणीस उशीर होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक मका उत्पादन होते. राज्यात एकूण अकरा लाख हेक्टवर मका पिकाचे क्षेत्र असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख हेक्टर क्षेत्र आहे. सिल्लोड तालुका सरासरी उत्पादनात आघाडीवर आहे. या भागात मका प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी १५ वर्षांपासून रखडलेली आहे. मात्र, राज्य शासनाने प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याऐवजी मका संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या केंद्रासाठी २२ कोटी १८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक प्रक्रिया लांबल्यामुळे मका संशोधन केंद्र कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हजारो शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे केंद्र लवकर उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मका हब कागदावरच राहिले
बारा वर्षांपूर्वी तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात मका हब उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता. जिल्ह्यात मका उत्पादन विक्रमी होते. मात्र, शेतकऱ्यांना माल साठवणुकीसाठी जागा नाही. त्यामुळे जागा उपलब्ध करुन देण्याचा मका हबचा उद्देश होता. त्यासाठी तातडीने १५ कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणाही झाली होती. प्रत्यक्षात ‘मका हब’ कागदावरच राहिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून जमिनीची मोजणी प्रक्रिया करण्याबाबत आजच पत्र मिळाले आहे. बांधकाम निविदा यापूर्वीच निघाल्या आहेत. येत्या १५-२० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संशोधन केंद्र उभारणीला सुरुवात होईल.– डी. के. पाटील, प्रभारी अधिकारी, मका संशोधन केंद्र, सिल्लोड