धुळे शहरातल्या श्री. संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये अनोखा उपक्रम राबवला जातोय. श्रावणातला पहिला सण म्हणून रक्षाबंधन सणाला विशेष असं महत्त्व आहे. रक्षाबंधन सणासाठी राख्यांना मोठी मागणी असते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धुळ्यातल्या श्री. संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये मतिमंद मुलींनी अनोख्या अशा राख्या तयार केल्या आहेत. रंगीबिरंगी विविध कलाकुसरीच्या या राख्या शाळेतील कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी तयार केल्या आहेत.
गतिमंद असल्या तरी अतिशय सुरेखपणे या मुली सुंदर अशा राख्या तयार करतात. यमुनाई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला संस्थेच्या श्री. संस्कार मतिमंद शाळेमध्ये तब्बल ९८ मुली प्रवेशित आहेत. या शाळेत शिकणाऱ्या मुलींना व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जातं. यात ग्रीटिंग कार्ड तयार करणे, राख्या बनवणे, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, असो की गुढीपाडव्यासाठी लागणारे आकर्षक गुढ्या अशा विविध सणांसाठी लागणारे वस्तू या कार्यशाळेतील या विद्यार्थिनी आपल्या कार्य कुशलतेने तयार करतात. म्हणूनच श्री. संस्कार मतिमंद शाळेत तयार होणाऱ्या राख्यांचे इतर वस्तूंना मोठी मागणी असते. या गतिमंद विद्यार्थिनींना शाळेतील कलाशिक्षक विविध साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण देतात. गतिमंद असले तरी या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.