आज सकाळी त्याचा मृतदेह पानकनेरगाव शिवारात आढळून आला असता सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी त्याचा मोबाईल देखील सापडला. त्यात मेसेजही टाईप केलेला आढळून आला आहे. व्हॉट्सअप मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की, ”संभाजीनगर येथील वाडोद बाजार पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी त्यास मारहाण केली. तसेच एका मुलीस तिचा जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्याचबरोबर मुलीला देखील त्यांनी मारहाण केली. त्यांनी सर्वांकडून पैसे घेतल्याचं” मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
”माझे ज्या मुलीवर प्रेम होते, त्या मुलीला देखील उपनिरीक्षक खाडे यांनी ब्लॅकमेल केलं. मला झाडावरून खाली उतरवेपर्यंत सर्वांना अटक झाली पाहिजे. तसेच उपनिरीक्षक खाडे यांना देखील पोलीस सेवेतून कायमचं निलंबित करण्यात यावे एवढी इच्छा” असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. रेणुका पिंपळगाव आणि पानकनेरगाव येथील एका कुटुंबातील सदस्यांची नावे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यात केली आहे.
आकाश देशमुख हा चालक म्हणून काम करत होता. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्यानंतर त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात काही दिवस तो तुरुंगात देखील होता आणि काही दिवसापूर्वीच तो तुरुंगातून आला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. मात्र, जोपर्यंत मेसेजमध्ये नावे असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आकाश याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका देखील नातेवाईकांनी घेतली आहे.