खरिपात घेतल्या जाणाऱ्या पीकांमध्ये जुलै महिनाअखेरीस देशभरातील धान्यपेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत २.८८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. ती ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडाअखेरीस १.४० टक्क्यांवर आली आहे. डाळी व तेलबिया, या प्रमुख पीकांचा विचार केल्यास ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या पीकांच्या पेरणी क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ६.६७ व ०.९३ टक्के इतकीच आहे. या दोन्ही पीकांच्या पेरणी क्षेत्रातील वाढ जुलैअखेरीस मागील वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे १०.९३ टक्के व २.९५ टक्के इतकी होती. पाऊस थांबल्याने त्यात घट झाली आहे. सरासरीचा विचार केल्यास, देशभरात खरिपातील पेरणीक्षेत्रात जुलैअखेरीस १७.४५ टक्के घट होती. ही घट आता १० टक्क्यांच्याजवळ आली आहे. मात्र, डाळींच्या पेरणीक्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा १४ टक्के व तेलबियांच्या पेरणीक्षेत्रात सरासरीपेक्षा ३.४० टक्क्यांची घट आहे.
केंद्रीय कृषी आयुक्तालयातील उच्चाधिकाऱ्यांनुसार, जुलै महिन्यातील स्थितीनुसार यंदा दमदार धान्य उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, आता ऑगस्टमधील स्थिती बदलली आहे. देशभरात खरिपाच्या पेरण्या सहसा १० ऑगस्टपर्यंत संपतात. फार मोजक्या ठिकाणी त्यानंतर पेरण्या होतात. त्यामुळे सध्या जी पेरण्यांची स्थिती आहे, तीच कायम राहण्याची चिन्हे आहेत. हे क्षेत्र सरासरीपेक्षा कमी असल्याने चिंता आहे.
तांदळाची स्थिती चांगली
या हंगामात तांदळाची स्थिती काही प्रमाणात चांगली आहे. जुलैअखेरीस तांदळाच्या पेरणीक्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ५.२८ टक्क्यांची वाढ होती. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ही वाढ ४.२८ टक्के आहे. त्यात फार घट झालेली नाही. राज्यातही तांदळाच्या पेरणीक्षेत्रात सरासरी व मागील वर्षीपेक्षा जेमतेम पाव टक्क्यांची घट आहे. येत्या आठवडाभरात आणखी पाऊस पडल्यास तांदळाचे पेरणीक्षेत्र वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रमुख धान्यांचे पेरणीक्षेत्र असे (लाख/हेक्टर)
धान्य मागील वर्षी यंदा सरासरी
तांदूळ ३१८.१६ ३३१.७८ ४०१.५५
डाळी ११०.०८ ११७.४३ १३६.०२
तेलबिया १८२.१७ १८३.६९ १९०.१८
श्री अन्न (भरड) १७१.३६ १७३.१३ १८०.८६