विधानसभेसाठी काँग्रेसचा प्लान काय?
राज्यात आता पुढील दोन ते तीन महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका लागतील. अशामध्ये महाविकास आघाडीने आतापासूनच निवडणुकीची तयारी केले आहे असे एकंदरीत दिसत आहे. तसेच काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात खुद्द उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा आम्ही पाठिंबा देऊ असे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्देशून म्हटले होते. यावर शरद पवारांनी काहीच विधान केले नाही तर नाना पटोले यांनी हायकंमाड निर्णय घेईल असे विधान केले होते. आता होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीआधी किंवा नंतर महाविकास आघाडी निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमरावतीत काँग्रेसची बैठक झाली.चेन्नीथला म्हणाले,आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करताना मुंबईत बसून निर्णय घेतले जाणार नाही. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल. आता त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काही जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २० ऑगस्टला काँग्रेसकडून सद्भावना दिवस आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रात अवघ्या काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्ताने बीकेसी मैदानात भव्य मेळावा घेण्याचा काँग्रेसचा मानस होता. परंतु, सभेसाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली त्यामुळे ही सभा आता शीव येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.
या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.