बोरगाव गावचे सुपुत्र जीआरईएफ आर्मीमधील तुषार राजेंद्र घाडगे आणि त्यांचे दोन सहकारी गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यासाठी रस्ता बनवायला ड्रीलिंगचे काम करत होते. त्यावेळी अचानक झालेल्या भूस्खलनामध्ये तुषार यांच्या डोक्यात जोराचा दगड लागला. तेथील जवानांनी त्यांना टीप्परमधून आरसीसीमध्ये आणले. तेथून ॲम्ब्युलन्सने आर्मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.
वीर जवान तुषार यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री तुषार घाडगे, मुलगा शिवांश तुषार घाडगे, आई मंगल राजेंद्र घाडगे, मोठा भाऊ विशाल राजेंद्र घाडगे, भावजय अश्विनी विशाल घाडगे, पुतणी शिवाई विशाल घाडगे असा परिवार आहे. तुषार यांचा मोठा भाऊ विशाल हेदेखील भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.
कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथे शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव सैन्य दलाच्या ताफ्याबरोबर आणले. यावेळी पंचक्रोशीतील युवकांनी रहिमतपूर ते बोरगावपर्यंत श्रद्धांजलीपर दुचाकी रॅली काढली. तुषार यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरासमोर नेण्यात आले. त्यानंतर पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढत स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे”च्या घोषणा देण्यात आल्या.
बोरगाव येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील अधिकारी आणि सैनिक आदींनी जवान तुषार घाडगे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देत फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली.