Laser Light Ban: पुण्यात दडीहंडीपासूनच लेझरबंदी! पोलिसांकडून गणेशोत्सवाआधीच होणार अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात लेझर बीम लाइटच्या वापरास बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासून होणार आहे. गेल्या काही वर्षातील अनुभवावरून दहीहंडीच्या दिवशी लेझर बीम लाइटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता दहीहंडीत पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

लाइटमुळे डोळ्यांना इजा

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेझर बीममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आले होते. पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची सुमारे १५ प्रकरणे विसर्जन मिरवणुकीनंतर समोर आली होती. ती संख्या नंतर वाढत गेली. काही जणांच्या जखमा गंभीर होत्या. त्यामुळे लेझर बीम लाइटवर बंदीची मागणी तेव्हापासून केली जात आहे.

कारवाईचा इशारा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपकावर लावण्याच येणाऱ्या लेझर बीम लाइटवर बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरात दहा दिवसांनी दहीहंडी (२७ ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे. शहरात काही ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे फलक लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यात ध्वनिक्षेपक कोणाचे असणार यासह ‘लाइट’ कोणाचे असणार हेदेखील ठळकपणे सांगण्यात आले आहे. काही फलकांवर ‘लाइट’ हे विशेष आकर्षण असेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस आता घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहतात का, हे पाहावे लागणार आहे.

‘साउंड’ मर्यादेचे उल्लंघन?

विसर्जन मिरवणूक, दहीहंडी किंवा अन्य धार्मिक मिरवणुकांमध्ये किती ध्वनिक्षेपकांचा (बेस, टॉप इत्यादी) वापर करावा, याची संख्या पोलिसांनी काही वर्षांपूर्वी निश्चित केली आहे. मात्र, त्या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. एका सत्ताधारी पक्षाच्या शहरातील प्रमुखाने दहीहंडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर ध्वनिक्षेपक लावणार असल्याची जाहिरात केली आहे. संबंधितांनी ध्वनिक्षेपकांची संख्या आणि आवाज मर्यादा ओलांडल्यास पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.

लेझर बीम लाइटच्या वापरावर घातलेली बंदी दहीहंडीपासूनच अंमलात येणार आहे. दहीहंडी साजरी करताना सर्वांनी नियमांचे पालन करावे.- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

Source link

Laser beam light banLaser light Banlaser lightningगणेश विसर्जनगणेशोत्सव २०२४दहीहंडी २०२४पुणे बातम्या
Comments (0)
Add Comment