Devendra Fadnavis: आशीर्वाद द्या, पाच वर्षे पैसे देऊ! उपमुख्यमंत्री फडणवीसांचा लाडक्या बहिणींना शब्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आले, तर आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना बंद केल्या जातील; पण आम्ही ‘लाडकी बहीण योजने’साठी मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तुम्ही माता भगिनींनी आशीर्वाद दिला, तर पुढील पाच वर्षे योजनेचे पैसे देत राहू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘प्रत्येकाच्या खात्यात पैसे दिल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही. योजनेद्वारे थेट खात्यात बँकेत रक्कम दिली जात आहे. त्यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली,’ असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेत विरोधकांनी आणलेल्या अडथळ्यांची मालिकाच जाहीर केली. पूर्वी सरकारी योजना आणली, की दलालांची योजना व्हायची. तुमच्यासाठी ठेवलेले पैसे हे १०-१५ टक्के रक्कम मिळायची; पण मोदी सरकारच्या योजनांमुळे आधार, मोबाइल क्रमांक आणि बँकेची जोडणी केल्याने रक्कम थेट खात्यात जमा होत आहे. त्यामुळे कोणीही दलाली खाऊ शकत नाही. आता दलालांचा धंदा बंद केला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

‘पुणे ही परिवर्तनाची भूमी’

‘ज्यावेळी परकीयांचे आक्रमण होत होते, महाराष्ट्र बेचिराख होत होता, त्या वेळी जिजाऊंनी पुण्यात सोन्याचे नांगर फिरवून शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना दिली. महिलांना शिक्षण नाकारणाऱ्या पुण्यातच सावित्रीबाई, जोतीबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुणे हे सर्वाधिक उपयुक्त ठिकाण. केवळ राजकारण, समाजकारण नाही, तर परिवर्तनाची भूमी ही पुणे आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून योजना सुरू केल्याचे स्पष्टीकरण दिले. मागील सरकार हे वसुली सरकार आहे. आमचे हे सरकार ‘देना बँक’ आहे. ‘लेना बँक’ नाही, अशीही टीका त्यांनी विरोधकांवर केली.
‘कोणी काय करावे हे ‘स्टंटमॅन’नी सांगू नये; सरकार लोकांसाठी काम करत आहे’; अमृता फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार
महाराष्ट्र बहिणीमय…!

‘लाडकी बहीण’ योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील बहिणींना पीएमपी, खासगी; तसेच एसटी बसने बालेवाडीच्या कार्यक्रमास्थळी आणले होते. त्यामुळे संपूर्ण क्रीडानगरीत महिलांची गर्दीच दिसत होती. बालेवाडीतील सुमारे पाच सभागृहांत महिलांची बसण्याची व्यवस्था केल्याने त्या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाचे त्या वेळी थेट प्रक्षेपण दाखविले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्र् माझा बहिणीमय झाला’, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

बहिणींनी बांधल्या राख्या

कार्यक्रमापूर्वी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांनी सादर केलेल्या गाण्यांच्या तालावर महिलांनी ठेका धरला होता. कार्यक्रमावेळी व्यासपीठाला जोडून सभागृहाच्या शेवटपर्यंत तयार केलेल्या रॅम्पवरून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्या वेळी त्यांनी उपस्थित बहिणींना अभिवादन केले; हस्तांदोलन केले. अनेकांनी शिंदे, फडणवीस, पवार यांना राख्या बांधल्या. काहींनी निवेदने दिली. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जवळून पाहण्यास मिळाल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

Source link

Devendra FadnavisDevendra Fadnavis on ladki bahin yojanaEknath Shindemahayuti governmentwoman schemesपुणे बातम्या
Comments (0)
Add Comment