म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठीही मुंबई महापालिकेच्या मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार आहे. सध्या महापालिकेचे साडेआठ हजार कर्मचारी निवडणूक कामांसाठी गुंतलेले असतानाच, आता विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केली आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांचाही समावेश आहे. याआधीच, निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या कामाची धुरा सांभाळतानाच दैनंदिन कामकाजासह मोठमोठे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर आहे. त्यातच निवडणुकीची जबाबदारी आल्याने दुहेरी कामाचा ताण सहन करावा लागणार आहे.
मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला असताना, निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेतील चार अतिरिक्त महापालिका आयुक्त तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश आहे. निवडणूकविषयक कामकाज सुनियोजित असावे, सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावा, यासाठी या सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) हे पद सध्या रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्याकडे आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) या पदावर आधी डॉ. सुधाकर शिंदे होते. नुकतीच त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर महापालिकेतील हे पद रिक्तच आहे. बांगर यांच्याकडे रस्ते, उड्डाणपुलातील महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबरच पाणीपुरवठा आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प अडकू नयेत, यासाठी सध्या महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची प्रकल्प, निविदा मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणुकांच्याही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याने महापालिकेच्या कामांवर परिणामांची शक्यता नाकारता येत नाही.

मतदारसंघनिहाय जबाबदारी
१. संजय यादव- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी | विधानसभा मतदारसंघ-वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा |
२. डॉ.अश्विनी जोशी- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) | विधानसभा मतदारसंघ- धारावी, शीव कोळीवाडा, वडाळा, माहीम |
३. डॉ.अमित सैनी- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) | विधानसभा मतदारसंघ- अणुशक्ती नगर, चेंबूर (दक्षिण मध्य मुंबई), मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर (मुंबई उत्तर पूर्व) |
४. राजेंद्र क्षीरसागर- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी | विधानसभा मतदारसंघ- विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम |
५. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) | विधासभा मतदारसंघ- जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व |
६. अभिजीत बांगर- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) | विधानसभा मतदारसंघ- बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम |
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही जबाबदारी
विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबई महापालिकेचे साडेआठ हजार कर्मचारी जाऊ लागले आहेत. यामध्ये महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील प्रमुख अभियंता विभागातील पाच हजार २५ कर्मचारी आहेत. तर रस्ते व वाहतूक विभाग, जलअभियंता खाते यांसह अन्य विभागातील कर्मचारीदेखील आहेत. निवडणूक कामकाजासाठी लागणाऱ्या या मनुष्यबळात आणखी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी मुंबईत विधानसभानिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्याचीही जबाबदारी महापालिकेकडे दिली जाणार आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या संख्येविषयी महापालिकेने आयोगाकडे विचारणा केली आहे.