Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचा भाजपला फायदा होणार? सर्व्हे आला, ५५% लोक म्हणतात…

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मतदारांनी झटका दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना महिनाकाठी दीड हजार रुपये मिळणार आहेत. लाखो महिलांना जून, ऑगस्टचे मिळून ३ हजार रुपये मिळाले आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

मध्य प्रदेशातील भाजप सरकारनं सर्वप्रथम मुख्यमंत्री लाडली बहेना योजना आणली. त्याच धर्तीवर राज्यात महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. महायुतीत असलेले तिन्ही पक्ष सध्या या योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत. शिंदेसेना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख प्रत्येक कार्यक्रमात करत आहे. तर भाजपकडून या योजनेचा उल्लेख लाडकी बहीण असा केला जात आहे. अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेच्या बसवर योजनेचा उल्लेख माझी लाडकी बहीण योजना असा करण्यात आला आहे. दादा गटानं योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळलेला आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर डल्ला, महिलांचा हिरमोड; योजनेमुळे कोणाचा भरतोय गल्ला?
जूनच्या अखेरीस जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली. या योजनेचा लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना गेमचेंजर ठरेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. या योजनेवर राज्य सरकार वर्षाला ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. टाईम्स नाऊ नवभारत आणि मॅटराईजनं केलेल्या सर्वेक्षणात लोकांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

लाडकी बहीण योजनेचा फायदा भाजपला होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सर्व्हेत सहभागी झालेल्या ५५ टक्के जणांनी खूप फायदा होईल, असं मत व्यक्त केलं. तर २१ टक्के लोकांनी काही प्रमाणात लाभ होईल, असं मत नोंदवलं. लाडकी बहीण योजनेचा कोणताही फायदा होणार नाही, असं १० टक्के लोकांना वाटतं. तर ८ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. ६ टक्के लोकांना ही योजना निवडणुकीसाठी आणण्यात आल्याचं वाटतं.

Source link

bjp-shiv senaMaharashtra Political NewsMaharashtra politicsmazi ladki bahin yojanaMukhyamantri Majhi Ladki Bahin Yojanaएकनाथ शिंदेभाजपमहाराष्ट्र राजकीय बातम्यामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment