डॉक्टरांनी शोधलं खास उपकरण
लातूरच्या डॉ. आशिष गुळवे यांनी एक उपकरण तयार केलं आहे. या उपकरणातून रक्ताची चाचणी केल्यानंतर तात्काळ कळेल की हार्ट अटॅकचा धोका कितपत आहे. आत्तापर्यंत कार्डियाक अरेस्ट येणाऱ्या लोकांमध्ये रक्तातील विशिष्ट पेशी वाढल्या जातात, यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त संभावतो. हाच धोका टाळण्यासाठी मागील पाच वर्षांपासून या विषयावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर आशिष गुळवे यांनी या उपकरणाचा शोध लावला. या उपकरणामुळे हार्ट अटॅकचा संकेत वेळीच रुग्णाला मिळेल आणि यामुळे अनेक लोकांचे जीव वाचतील, असं डॉक्टर गुळवे म्हणाले.
याचा नेमका उपयोग कसा होईल?
सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होत आहे. या काळात कार्डियाक अरेस्ट आणि हृदयविकार हे दोन रोग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासाठी एक उपकरण तयार करण्यात आलं असून या उपकरणामुळे रुग्णाला काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं कळतील.
उपकरणाद्वारे रक्ताची चाचणी करुन लगेच रक्तातील कोणत्या प्रकारचे घटक वाढले आहे हे समजेल. त्यामुळे रक्तातील हृदयविकाराच्या झटक्यासाठी जबाबदार असलेले किंवा वाढलेले घटक तात्काळ समजतील आणि डॉक्टरांना रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का याचा अंदाज येईल. यामुळे हे उपकरण येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
मागील पाच वर्षांपासून यावर संशोधन सुरू
करोना काळानंतर देशातील अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे डॉ. आशिष गुळवे यांनी यावर संशोधन सुरू केलं होतं. या संशोधनात त्यांना कार्डियाक अरेस्ट या हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आलं. त्यांनी रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर रक्तामधील काही विशेष्ट मूलतत्त्वांची वाढ झाल्यामुळे अशा प्रकाराचा झटका आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. रक्ताचे वेगवेगळे नमुने एकत्र करून त्यांनी यावर संशोधन केलं आणि त्यांनी हृदयविकार येण्याआधीच लक्षण समजणारं उपकरण तयार केलं.