मुख्यमंत्री आंदोलकांना भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात सोमवारी १९ ऑगस्ट रोजी बैठकीची वेळ दिली आहे. सुरेंद्र पवार, स्वरुप जंगम, रूपेश दर्गे जन आक्रोश समितीचे हे तीन पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलना रायगड जिल्ह्यातूनही उत्तम प्रतिसाद विविध सामाजिक व्यापारी संघटनांनी दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे, मुंबई परिसरातूनही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळू लागला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव एसटी स्टँड समोर हे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या चौथ्या दिवसानंतर या आंदोलनाची धार आता अधिक तीव्र झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आक्रोश समितीचे पदाधिकारी संजय यादवराव यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले आहे. या बैठकीत आता कोणता तोडगा निघतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी जनआक्रोश समिती गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत आहे, मात्र दरवर्षी आश्वासन आणि तारखा यापलीकडे या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न अद्याप सुटत नाही. त्यामुळे आता आमरण उपोषणाचा निर्धार जन आक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू केलं आहे. त्यांना मोठा पाठिंबा कोकणातून मिळू लागला आहे.
मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल, मात्र लेखी आश्वासनावर आंदोलक ठाम
हे आंदोलन सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एकाही आमदार खासदारांनी पहिल्या दिवशी आंदोलनाकडे लक्ष दिले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरा महाडचे आमदार भरत गोगावले त्यांनी उपोषणस्थळी जात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल केला आणि या सगळ्याचं गांभीर्य हे लक्षात आणून दिलं. व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण जनअक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावे, त्यानंतरच आमरण उपोषण मागे घेण्यासंदर्भात विचार केला जाईल अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने व्हिडिओ कॉलवरूनच प्रतिसाद देत १९ ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करा त्यानंतरच आम्ही कोकणात ग्रीन फील्ड हायवे होऊ देऊ, त्यामुळे सरकारने आता कोकणवासियांच्या भावनेचा, सहनशीलतेचा अंत बघू नये, सरकारने कोकणाकडे दुर्लक्ष करण्याचे बंद करा अन्यथा कोकणात लोकांच्या भावनेचा जनक्षोभ होईल असा इशारा दिला आहे. कोकणी माणूस अजून या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर केवळ सोशल मीडियातून व्यक्त होत आहे, त्याने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
जनआक्रोश समितीच्या ३ तरुणांकडून आमरण उपोषण
जनआक्रोश समितीच्या या तरुण तीन पदाधिकाऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे, मी त्यांचे अभिनंदन करणार नाही पण आपण कोकणवासियांनी त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत अशाही भावना संजय यादवराव यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. कोकणाने देशाची काळजी घेतली आहे, सगळे प्रमुख क्रांतिकारक हे कोकणातले होते. आता पुन्हा एकदा या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणातले हे तीन तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत, आंदोलन करत आहेत.
आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी हे आंदोलन तापलं आहे. तरीही शासनाने अद्याप याकडे गांभीर्याने यांनी लक्ष दिले नाही, असाही आरोप या जन आक्रोश समितीच्या पदाधिकारी उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे मोठी नाराजी कोकणात पाहायला मिळत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीनंतर या विषयात कोणतं लेखी आश्वासन मिळत तोडगा निघतो हे पाहणं मुंबई आणि कोकणवासीयांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.