घडलेल्या प्रकारानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मिडिया साइटवरुन ट्वीट करत, भाजपच्या कृत्याचा थेट जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला. अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे.काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा.आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकरींनी केली होती.
यावर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी ट्वीटला प्रत्युत्तर देत थेट मिटकरींवर हल्लाबोल चढवला आहे. जगदीश मुळीक ट्वीट करत म्हणाले, ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार ! अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढली आहे. हीच यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली होती. जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये दाखल होताच भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले आहे, असा आरोप आशा बुचकेंसहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवारांचा ताफा नियोजित बैठकीच्या दिशेने जात असताना त्याच मार्गावर अशाप्रकारे भाजपने केलेल्या आंदोलनामुळे युतीत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.