विभागात मागील २४ तासात म्हणजेच सकाळी आठपर्यंत सरासरी ८.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्व जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री मध्यम ते हलक्या स्वरुपातील पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात सकाळी पाऊस सुरू झाला. हा रिमझिम पाऊस तासभर सुरू होता. शहरालगत असलेल्या भागात जोरदार पाऊस झाला आहे. शहरात सायंकाळपर्यंत ३.४ मिमी पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७.७ मिमी, जालना २५.९, बीड ४.२, लातूर १०.२, धाराशिव ५.२, नांदेड ९.८, परभणी १.४ आणि हिंगोली १.९ मिमी अशी जिल्हानिहाय नोंद झाली आहे. काही जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. जायकवाडी धरणात ३०.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. माजलगाव आणि सिना कोळेगाव धरण कोरडे आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा नाही.
धरणे व पाणीसाठा (टक्क्यांत)
– जायकवाडी – ३०
– निम्न दुधना – १०.२५
– येलदरी – ३४.१७
– सिद्धेश्वर – ५५.१७
– मांजरा – ६.०७
– विष्णुपुरी – ८६.५३
पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह
फुलंब्री : गेल्या पंधरा ते वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवार (१७ ऑगस्ट ) रोजी पहाटे तीन ते सहा वाजण्याच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात पंधरा ते वीस दिवसापूर्वी रिमझिम पाऊस पडत होता. त्यानंतर पावसाने दडी दिली कोवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना शेतकऱ्यांनी विहिरीत असलेल्या जेमतेम पाण्यावर पिकांना देण्यास सुरुवात केली होती. शनिवारी पहाटे अचानक जोरदार पाऊस सुरू झाला, हा पाऊस कपाशी, मका, सोयाबीन, आद्रकासह अनेक पिकांना लाभदायी ठरला. पावसाच्या पाण्याने काही ठिकाणी नदी-नाले भरून आल्याने नद्या दुथडी भरून वाहात होत्या.