Rahul Gandhi: …तर राहुल गांधींना होऊ शकतो २ वर्षांचा कारावास; आज पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ‘समन्स’ मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट निघू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, तक्रारीत तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला आहे.

गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम २०२’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. याची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.

.. तर दोन वर्षे तुरुंगवास

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २०० अन्वये तक्रार दाखल आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कमाल दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.
राहुल गांधी भारतीय नाहीत, सुब्रमण्यम स्वामींचा पुन्हा दावा; सुप्रीम कोर्टात याचिका
‘समन्स’ पूर्तता महत्त्वाची

या प्रकरणात राहुल गांधी यांना ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाल्यास, त्याचा अहवाल न्यायालयात येईल. त्यानंतरही राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत, तर अटकेचे वॉरंट काढले जाते. परंतु, ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाली नसेल, तर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेच्या पूर्ततेवर राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Source link

CongressRahul Gandhirahul gandhi congressrahul gandhi controversial statementrahul gandhi savarkar statementपुणे न्यायालयभारतीय दंड संहितास्वातंत्र्यवीर सावरकर
Comments (0)
Add Comment