पुण्यात पावसाने दाणादाण, रस्त्यांवर पाण्याचे लोंढे; ती एक चूक अन् महिलेचा हादरवणारा अंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: सलग दुसऱ्या दि‌वशी रविवारी संध्याकाळी ढगाच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मध्यवर्ती पुण्यासह पूर्व पुण्याला झोडपले. लोहगाव, येरवडा, हडपसर, कात्रज, येवलेवाडी भागात अचानक पावसाचा जोर वाढल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी परताना गुडघ्याए‌वढ्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. उपरस्त्यांबरोबरच अनेक सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वडगाव शेरी भागात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने दोन तासांत १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

रस्त्यांवर पाण्याचे लोंढे

शहरात पाऊस कोसळला असला तरी लोणावळा, मावळ भाग वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस पडला नाही. धरणक्षेत्रातही दिवसभरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. रविवारी सकाळी हवेत गारवा नव्हता. दुपारपर्यंत उकाडा वाढत गेला आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास शहरात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. महापालिकेने ड्रेनेजची स्वच्छता केलेली असली तरी रविवारी पावसाला जोर जास्त असल्याने मुख्य रस्त्यांसह अंतर्गंत रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. काही भागात वाट न मिळाल्याने रस्त्यावर गुडघाभर उंचीचे पाणी साठले. त्यामुळे रस्त्यावर चारचाकी गाड्याही पाण्यात होत्या.

दुचाकी पाण्यात

वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा भागात दुचाकी पाण्याखाली गेल्या होत्या. त्या भागातील काही सोसायट्या, वसाहतींमधील घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हडपसर, वानवडी, कात्रज भागालाही पावसाने झोडपले. रस्त्यावर पाणी साठल्याने ठिकठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. बाजारपेठांमधून घराच्या दिशेने निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीसह विविध समस्यांचा सामना करावा लागला. कात्रज भागातही सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली आणि थोड्या वेळातच जोर वाढला. नागझरीचे पाणी लगतच्या परिसरात शिरले. काही सोसायट्यांमध्येही पाणी साठले होते. रस्त्यांवर पाणी वाहताना दिसले.

टिंबर मार्केटमध्ये पाणी

पूर्व पुण्यातील उपनगरांबरोबरच मध्यवर्ती पुण्यात गंजपेठ, टिंबर मार्केटमधील मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. टिंबर मार्केटमधील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक रस्त्यावरून उतरून पाण्याला वाट करून देण्यासाठी प्रयत्न करत होते. काही गल्ल्यांमध्ये कंबरेच्या उंचीएवढे पाणी साठले होते. पावसामुळे उपनगरांमधील वीजपुरवठा विस्कळित झाला, काही ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद झाली.

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

कोंढवा खुर्द येथील भाग्योदयनगर परिसरात रस्त्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने पादचारी महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. कल्पना रमेश विश्वकर्मा (वय ३२, रा. कोंढवा खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला रविवारी सायंकाळी भाग्योदयनगर येथून पायी घरी जात होती. पावसाच्या पाण्यामुले तयार झालेल्या एका डबक्यात तिचा पाय पडला आणि महिला रस्त्यावर कोसळली. त्या पाण्यात वीजेचा प्रवाह उतरला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Source link

electricity shockheavy rain in punepune live newspune rain update newspune woman lost lifeपुणे पाऊस बातम्यापुण्यात जोरदार पाऊसपुण्यात पाऊसमहाराष्ट्र पाऊस
Comments (0)
Add Comment