नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात अल्पसंख्याक चेहऱ्यांना संधी दिली नव्हती. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये नाराजी होती. नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली दरबारी आपली नाराजी बोलून दाखवली होती. ही नाराजी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या कानीही वारंवार घालण्यात आली होती. अलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक चेहऱ्यांना संधी मिळावी, यासाठी अनेकांनी दिल्लीवारी केली होती. मात्र अल्पसंख्याक नेत्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे अल्पसंख्याक नेत्यांमधील नाराजीत भर पडली होती.
आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रमुख आव्हान पक्षातील दिग्गज नेत्यांसमोर होते. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, अल्पसंख्यक नेत्यांना विशेष जबाबदारी देण्याची चर्चा सुरू असतानाच पक्षश्रेष्ठींनी केवळ विविध पदांवर नियुक्ती करत अल्पसंख्याक नेत्यांची बोळवण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने अल्पसंख्याक नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांना वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित पदी नियुक्त करण्यात आले. त्याशिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा देण्यात आली आहे. असे असले, तरी विधानसभा निवडणुकीत मात्र किती जणांना उमेदवारी मिळते, याबाबत अल्पसंख्याक नेत्यांमध्ये साशंकताच आहे.
शक्तिप्रदर्शनास सुरुवात
काँग्रेसने अल्पसंख्याक नेत्यांची विविध पदांवर नियुक्ती केल्यानंतर, मुंबईत शक्तिप्रदर्शनाचे वारे वाहत आहेत. नसीम खान यांच्या अभिनंदनाचे पोस्टर मुंबईत ठिकठिकाणी लागले असून येत्या काळात अल्पसंख्याक नेत्यांकडून पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मतांसाठी जुळवाजुळव
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला, विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अल्पसंख्यकांनी भरभरून मते दिली होती. त्यामुळे काँग्रेसने अल्पसंख्याक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.