सायबर चोरांनाही बहीण ‘लाडकी’; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा, अशी होऊ शकते फसवणूक

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यात गाजावाजा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून अनेकांच्या खात्यांबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. अशा महिलांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात असून बँकेचा तपशील, ओटीपी जाणून घेतला जात आहे. हा फोन सायबर चोराचा असू शकतो, असा इशारा देत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी महिलांना सावध केले आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. काहींच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत, तर लाखो महिलांच्या बँक खात्यांबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. यापैकी काहींचे ‘केवायसी’ अपडेट नाही, तर काहींच्या खात्यावर ॲानलाइन पैसे वळते होत नाहीत. आर्थिक स्थिती चांगली असल्याने काहींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अशी वेगवेगळी कारणे आहेत. अजूनही अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत.

एकीकडे या योजनेचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी महिलांचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे सायबर चोरांनी अशा अर्जदार महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोर कशाप्रकारे फसवणूक करू शकतात आणि फसवणूक होऊ नये म्हणून कोणती सावधगिरी घ्यायला हवी, याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अशी होऊ शकते फसवणूक

– या योजनेची कागदपत्रे, अर्ज पडताळणीचे कारण सांगून फोन येऊ शकतो.
– योजनेचा पहिला हप्ता जमा करायचा असून शहानिशा करण्यासाठी संपर्क करत असल्याचे भासविले जाऊ शकते.
– फोनच्या माध्यमातून समोरची व्यक्ती तुमच्याकडे ओटीपी मागू शकतो.
– एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला किंवा एखादे अॅप्लिकेशन उघडायला सांगितले जाऊ शकते.
– लिंकवर क्लिक केल्यास किंवा ओटीपी दिल्यास फोन हॅक होऊ शकतो, त्यामुळे तुमचे बँक अकाउंटदेखील रिकामे होऊ शकते.

म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल!
ही सावधगिरी गरजेची

– कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
– कोणतीही शंका असल्यास जवळच्या सेतू कार्यालयात जाऊन शहानिशा करा.
– बँक खात्याचा तपशील अथवा ओटीपी कुणालाही देऊ नका.
– अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
– फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
– जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

Source link

cyber alertkyc updateLadki Bahin Yojana Scammaharashtra cyber policemaharashtra govtmobile hackमुंबई बातम्यामुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment