लोकसभेला आधी तळ्यात मग मळ्यात
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी (शरदचंद्र पवार पक्ष) महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईतून अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला होता. आधी पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे असलेल्या अभिजित पाटील यांनी कारखान्यावरील कारवाईनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. दुर्दैवाने दोन्ही उमेदवारांना पराभवाचा झटका बसला.
माढा विधानसभेतील राजकीय गणितं काय?
माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सलग सहा टर्म आमदार बबनराव शिंदे आमदार आहेत. यंदा त्यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पुतणे धनराज शिंदे हेसुद्धा विधानसभेसाठी उत्सुक आहेत. बबन शिंदे हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. अभिजित पाटलांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याऐवजी महायुतीला पाठिंबा दिला. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते विधानसभा लढल्यास भाजपकडून रिंगणात उतरु शकतात. यावरुन भाजप-राष्ट्रवादीत तणातणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा अंतर्गत माढा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांतील काही भाग समाविष्ट होतो. युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. त्यामुळे महाविकास आघाडीत शरद पवार उमेदवार देणार की उद्धव ठाकरे हे पाहणंही महत्त्वाचं आहे.