जरांगे पाटलांचे माझ्यावर विशेष प्रेम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय घ्यायचे आहेत पण देवेंद्र फडणवीस त्यांना निर्णय घेऊ देत नाही. असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केला होता. या आरोपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, ” मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राज्याचे सर्व महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. शिंदे यांना पूर्णपणे पाठबळ देण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे मी जर आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अडवणूक करत असेल तर हे त्यांना विचारण्यात यावं. त्यांनी जर हो म्हंटलं तर मी त्या क्षणीच राजीनामा देईल.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राजकारणातून संन्यास घेईन
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ” आजपर्यंत मराठा आरक्षणा संदर्भातील जे काही निर्णय झाले. ते मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. मी शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे वेगळा नरेटिव्ह सेट तयार करणे हे अतिशय अयोग्य आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावे. मी राजीनामा तर देईनच पण राजकारणातून देखील संन्यास घेईन असं फडणवीस म्हणाले आहेत.
निवडणुकांच्या घोषणांचे राजकारण करू नये
आगामी विधानसभा निवडणूकांच्या घोषणेवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”निवडणूक कोण घोषित करतं, त्याचे अधिकार काय आहेत? हे ज्या लोकांना माहीत नाही असे लोक आरोप करत आहेत. प्रत्येक गोष्टीवर राजकारण करणे चुकीचे आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत.