राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी (दि. १९) आयोजित महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांवर हल्लाबोल केला. राज्यातील मंत्रीच भडक भाषणे करीत आहेत. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी झालेल्या दंगलींमागे अदृश्य शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे या दंगलींची पारदर्शीपणे चौकशी करण्याची मागणीही खासदार सुळे यांनी केली. पैशाने सर्वकाही विकत घेता येत नाही. बँकेत पैसे आल्यास ते तातडीने काढून घ्या. कारण, अर्ध्या बँका बुडाल्या असल्याचा आरोपही सुळे यांनी केला. राज्यात आपले सरकार आल्यानंतर सध्याची लाडकी बहीण योजना अधिक बळकट करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी ६५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यानंतर सर्वप्रथम शेती व त्यासोबत निगडित वस्तूंवरील ‘जीएसटी’ हटविण्यात येईल, अशी घोषणा सुळे यांनी केली. यावेळी निवडणुकीसाठी तन-मनाने कामाला लागावे, असा सल्लाही त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी नाशिक प्रभारी तिलोत्तमा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, शहराध्यक्षा अनिता दामले, नाना महाले, मुन्नाभाई अन्सारी आदी उपस्थित होते.
‘…तर सर्व दिले असते’
राज्यात अदृश्य शक्ती कार्यरत असून, त्यांनी आपला पक्ष फोडला, चिन्ह पळविले. आपल्यातील काही जणांनी विकासाच्या नावावर विरोधकांशी हातमिळवणी केली. पण, ईडी, सीबीआय आणि जेलची भीती वाटत असल्याने ते आपल्याला सोडून गेले, असा टोला खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळत केला. पण, आम्ही प्रामाणिक व स्वाभिमानी मराठी आहोत. आपली लढाई वैचारिक असल्याचे सांगताना बहिणीकडे प्रेमाने मागितले असते, तर पक्षच काय सर्व दिले असते, अशा शब्दांत सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.