Pune Crime: पुण्यात चाललंय काय? रस्त्यात गाडी घेऊन का थांबला विचारलं अन् थेट लाथाबुक्क्या, दात पाडले

पिंपरी: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चोरी, भरदिवसा हत्या, गोळीबार, अपघात, हिट अँड रन सारख्या घटना तर पुण्यात सतत घडत आहेत. तर, लहान-मोठ्या घटना तर सामान्य झाल्या आहेत, असं वाटतं. आता पिंपरीत रस्त्यात गाडी थांबवली म्हणून एकाला मारहाण करत त्याचे दात तोडण्यात आल्याची घटना घडली आहे. काय आहे प्रकरण पाहा…

रस्त्यात गाडी घेऊन थांबलेल्या चालकाच्या तोंडावर बुक्की मारून त्याचे दोन दात पडल्याची घटना एम. बी. कॅम्प, देहूरोड येथे शनिवारी (१७ ऑगस्ट) दुपारी घडली. विकास रामेर वाल्मिकी (वय ३६, रा. मेन बाजार, देहूरोड) यांनी या प्रकरणी रविवारी (१८ ऑगस्ट) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजित रामकुमार, वेल्लु कलीमूर्ती चिन्नतंबी (वय ३७, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी शरणबसप्पा यांच्यासह एम. बी. कॅम्प परिसरात थांबले होते. त्या वेळी तिथे आलेल्या चार आरोपींनी ‘रस्त्यात गाडी घेऊन का थांबला आहेस,’ असे म्हणून फिर्यादी विकासला लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण करून जखमी केले. विकासच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. विकासचा मावसभाऊ चेतनलाही मारहाण केली.

परस्परविरोधी तक्रारही दाखल

फिर्यादी वेल्लू कलीमूर्ती चिन्नतंबी (रा. देहूरोड) यांनी याच्या परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार, विकास वाल्मिकी आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेल्लू रस्त्याने जात असताना त्यांना त्यांच्या पुतण्याचे भांडण सुरू असल्याचे दिसले. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी विकासने शिवीगाळ करून लाकडी काठीने वेल्लू यांना मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने वेल्लू आणि अजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Source link

crime news todaypimpri man beaten by fourPune crime newsपिंपरी क्राइमपुणे क्राइमपुणे बातम्यापुण्यात रस्त्यात मारहाण
Comments (0)
Add Comment