बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली.
जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश
शाळेत अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये पोलिसांवर दगडफेक
गळवारी सकाळपासूनच घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या दिला होता. पोलीस आंदोलकांना समजावून सांगत होते, मात्र आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. आरोपीला फाशी द्या, अशा घोषणा आंदोलक देत होते. जवळपास तासभर प्रयत्न करूनही आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून उठत नसल्याचे पाहून पोलिसांनी जरासे आक्रमक झाले. त्याचवेळी आंदोलकांनी देखील रौद्र रुप धारण करून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली.