Badlapur News : घटनेनंतर प्रशासनाला आली जाग, संस्था चालकाला हटवणार, शाळेवर प्रशासक नेमला जाणार

ठाणे (बदलापूर) : बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच या घटनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. शाळेच्या संस्था चालकांना हटवण्यात येणार असून त्यांच्या जागी शाळेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमला जाणार आहे. शिक्षण विभागाला या संदर्भातील अहवाल आज रात्री देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांचे निलंबन

देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळाआधीच बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.तसेच सरकारने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची माहिती दिली आहे. बदलापूरातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करुन बदलापूर प्रकरणातील पुढचा तपास करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा संस्थाचालकांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची दखल घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याचे सीएम शिंदे यांनी सांगितले आहे.

Source link

Badlapurbadlapur crime newsNews badlapur news todayबदलापूरबदलापूर न्यूजबदलापूर बातमी
Comments (0)
Add Comment