आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी आज २१ ऑगस्टला संपणार होती. पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कशासाठी पोलीस कोठडीत वाढ?
आरोपीने अश्या प्रकारची आणखी काही लैंगिक शोषण किंवा कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मुलींना आरोपी काय सांगून न्यायचा आणि त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा, या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे
कलम १६३ लागू
दरम्यान, बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आदर्श शाळेत पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरातील बहुतांश भागातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.
काय आहे प्रकरण?
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी रेल्वेरुळांवर ठिय्या मांडला.
रेल्वे स्थानकातील प्रवाशांनीही आंदोलनात उडी घेतल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. पोलिस प्रशासनाकडून समजूत घालण्याचा आणि काहीसा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागले. प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक रूप धारण करून आंदोलकांवर बळाचा वापर करून दहा तासांनंतर रेल्वेमार्ग मोकळा केला.