महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठकी संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या १० वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली.
सरकारकडून कारवाई करण्याबाबत दिरंगाई
बदलापूर घटनेटत शाळा आणि इतर प्रशासनाने दिरंगाई केली असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तसेच सरकारकडूनही कारवाई करण्याबाबत दिरंगाई झाली. त्यातही बदलापूर आंदोलनावर सत्तापक्षातून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी आहेत. सरकारने संवेदनशीलपणे हा मुद्दा हाताळावा, असे नाना पटोले आणि जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी
तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांवर आणि महायुती सरकारच्या कारभारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील आम्ही तिन्ही पक्ष सामिल होऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथेच कायदा धाब्यावर बसवला जातोय, राज ठाकरे आक्रमक
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.