Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

गोंदिया : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यासह देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. ”लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाटून स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे. अशी भावना निर्माण करा” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे हे गोंदिया दौऱ्यावर असून ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट देखील केलं आहे. ते म्हणाले की, ” जनतेच्या पैशांतून लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा आणि स्वत:ची ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का? याचा विचार करा. माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे आज हा विषय समोर आला याचा मला अभिमान आहे. अशा घटना घडू नये यासाठी कडक कायदे करू त्याची अंमलबजावणी करावी”. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

घटना घडली तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. ” ते म्हणाले की, ” जिथे घटना घडली तो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात जर अशी परिस्थिती आहे तेव्हा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही”. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित

बदलापूरमध्ये झालेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं होते. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी राज्य सरकारकडे केली होती.

Source link

Badlapurbadlapur crime newsBadlapur Newsबदलापूरबदलापूर घटनाबदलापूर न्यूजबदलापूर बातमी
Comments (0)
Add Comment