काँग्रेसने जयश्री पाटील यांना तिकीट न दिल्यास विधानसभेमध्ये देखील बंडखोरी अटळ आहे. तसेच आमच्यासोबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे 20 नगरसेवक असल्याचा दावा देखील जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसची माळ जयश्री पाटील यांच्या गळ्यात पडली नाही तर मात्र जयश्री पाटील या अपक्ष लढण्यावर ठाम असल्याने महाविकासआघाडी मधील बंडखोरी अटळ असल्याचं पहावयास मिळतं. तसेच गेल्या अनेक दिवसापासून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जयश्री पाटील ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत घोषित केले आहे.
शब्दाला जागून पाठिंबा द्यावा
जयश्री पाटील म्हणाल्या की, ”मागच्या वेळेस काही कारणास्तव आम्ही पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळेस पृथ्वीराज पाटील यांनी आम्हाला शब्द दिला होता की पुढच्या वेळेस तुम्ही निवडणूक लढा मी तुम्हाला पाठिंबा देतो त्यांनी त्यांच्या शब्दाला जागून मला पाठिंबा द्यावा”. अशी मागणी यावेळेस जयश्री पाटील यांनी केली आहे.
नाना पटोले यांची घेतली भेट
जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की, ”आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे. त्यांनी आम्हाला तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतु ऐनवेळी आम्हाला डावलण्यात आलं तर आम्ही अपक्ष निवडणूक लढणार आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आपल्यालाच पाठिंबा दिला आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे”.
दरम्यान, विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी ज्यावेळी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी केली होती. त्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत मोठ्या मताने त्यांचा विजय झाला यावेळेस उघडपणे पक्षाविरोधात भूमिका घेत जयश्री पाटील यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी उभं राहत शहरांमध्ये मोठे लीड मिळवून दिलं होतं. त्यामुळे खासदारांनी देखील मलाच पाठिंबा दिला आहे मी जरी अपक्ष लढले तरी देखील ते माझ्यासोबतच असतील यात काही शंका नाही. असा विश्वास जयश्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.