विद्यार्थिनींनी पालकांना ही माहिती दिल्यानंतर उरळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. ‘प्रशासनाने दोषी शिक्षकावर कारवाई न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मागणार,’ असा इशारा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी दिला होता. प्रशासनाने सरदार याच्यासह मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्रप्रमुखाला निलंबित केले. सरदार हा काझीखेडच्या शाळेत पाच वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळांमध्येही त्याने असे काही प्रकार केले काय, याविषयीची चौकशी सुरू केल्याची माहितीही सीईओ बी. वैष्णव यांनी दिली आहे.
शाळांमध्ये सुरक्षितता उपाययोजनांसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश सरकारने बुधवारी जारी केले आहेत. याची सर्व शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. काजीखेड येथील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बालकल्याण समिती व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘ई बॉक्स’ या सुविधेबाबत जागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महिला काँग्रेसचे घंटानाद आंदोलन
अकोला ग्रामीण महिला काँग्रेसतर्फे बाळापूर येथील विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा निषेध म्हणून घंटानाद आणि घुंगरू नाद आंदोलन केले. आरोपीवर कठोर कारवाई करून अशा घटना टाळण्यासाठी उपाय योजण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. अकोला ग्रामीण महिला काँगेसच्या जिल्हाध्यक्ष पूजा काळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.