जलवाहिनीचा व्हॉल फुटला, हजारो लीटर पाण्याची नासाडी
बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली – बदलापूर महामार्गावर पाले गावाजवळ एमआयडीसीची १६०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल फुटल्याचं समोर आलं. जलवाहिनी फुटल्याने जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं. हजारो लीटर पाण्याची नासाडी यावेळी झाली. त्यामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जलवाहिनी फुटल्यामुळे हवेत उंचच उंच पाण्याचे कारंजे उडत असल्याचं दिसत होतं.
धबधब्याप्रमाणे हे कारंजे उडत होते. कित्येक लीटर पाणी यामुळे वाया गेलं आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढून पुढे जावं लागत होतं. सध्या जलवाहिनीतून येणारं पाणी बंद करण्यात आलं आहे.
जेसीबीचा स्पर्श झाल्याने जलवाहिनीचा व्हॉल फुटल्याचा अंदाज
सध्या एमआयडीसीकडून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून लवकरच दुरुस्ती पूर्ण केली जाणार असल्याचं एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या जलवाहिनीच्या बाजूला नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे. त्यामुळे बाजूच्या जलवाहिनीवेळी काम करताना जेसीबीचा या व्हॉलला स्पर्श झाला असल्याचा अंदाज एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या एमआयडीसीकडून दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या घटनेमुळे कल्याण – डोंबिवली परिसरातील पाणी पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, यामुळे म्हापे, ठाणे, मीरा – भाईंदर, नवी मुंबई येथे परिसरात पाणी पुरवण्यावर परिणाम होऊ शकतो.