झिशान सिद्दीकी का संतापले?
वांद्रे पूर्व जागा आमची आहे असा प्रचार शिवसेना उबाठा गटाकडून सुरु आहे असा आरोप करत झिशान सिद्दीकी यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असे थेट आव्हान झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाला दिले आहे. मागील अनेक वर्ष वांद्रे पूर्व जागा ठाकरेंकडे होती पण काही विकास झाला नाही. मागील पाच वर्षातील विकास जनतेने पाहिला आहे. महाविकास आघाडीसोबत असताना आमदार म्हणून मला मिळणारा निधी अनिल परब यांना दिला जायचा. सरकारी कामात मला बोलावले जायचे नाही. वरिष्ठांकडून टार्गेट केले जायचे. पण जर काँग्रेसच्या नेतृत्वाला युवा आमदार सांभाळता येत नसेल तर कुठे जायचे असा सवाल थेट काँग्रेस हायकंमाडला झिशान सिद्दीकी यांनी विचारला आहे.
काँग्रेसला पाठीचा कणा हवा!
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी ठाकरेंच्या वांद्रे पूर्व जागेवरील आग्रहावरुन थेट काँग्रेसला घेरले आहे. माझे वडील राष्ट्रवादीत गेले तेव्हापासून मला पक्षाने दुय्यम वागणूक दिली. मला कोणत्याही बैठकीला बोलावले नाही. व्हॉट्सएपग्रुपमधून काढून टाकले. खासदार वर्षा गायकवाड यांच्या विजय यात्रेत सुद्धा मला निमंत्रित करण्यात आले नाही. काँग्रेस कार्यालय इच्छुकांकडून अर्ज घेते मात्र आमच्या प्रतिनिधीला अर्ज देण्यात आला नाही. वैयक्तिक टार्गेट करणे सहन करणार नाही. वांद्रे पूर्वमधील जागा काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीत जिंकली आहे. काँग्रेसला पाठीचा कणा असायला हवा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगावे वांद्रे पूर्वची जागा काँग्रेसची आहे असा थेट सल्ला झिशान सिद्दीकी यांनी दिला.
रात्री दोन वाजता फोन अन् बॅनर हटवले..
झिशान सिद्दीकी यांनी आणखी एक किस्सा शेअर केला. इंडिया आघाडीतील मुंबईच्या बैठकीचे नियोजन वांद्रे येथे करण्यात आले होते. यावेळी सर्वात जास्त बॅनर मी लावले होते पण मला माझ्या काँग्रेसच्या एका नेत्याने रागात फोन केला आणि दोन तासाच सगळे बॅनर काढा अशी सूचना दिली. उद्धव ठाकरे गट बॅनरमुळे नाराज असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले अशी माहिती झिशान सिद्दीकी यांनी दिली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा रात्री दोन वाजता ठाकरे गटासाठी फोन आला आणि आपण बॅनर हटवले असे खळबळजनक विधान झिशान सिद्दीकी यांनी बोलून दाखवले.