बंदर प्राधिकरणाशी संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरणाने पत मानांकन क्षेत्रातील एका कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्याच वेळी प्राधिकरणाने स्वत:ही अंतर्गत सर्वेक्षण केले होते. त्यानुसार मुंबई बंदराची आवश्यकता येत्या काळातही वाढतीच असेल. सध्याच्या वार्षिक ६७.२६ दशलक्ष टन कार्गो हाताळणीचा आकडा सन २०४७पर्यंत ११४ दशलक्ष टनाच्या घरात जाईल. त्यामुळेच प्राधिकरणाला नव्या प्रकल्पांचे नियोजन करावे लागेल, असे त्या कंपनीने म्हटले होते. त्यानुसार व्हिजन २०४७चे नियोजन सुरू केले असून त्यासाठी अलीकडेच महत्त्वाची कार्यशाळा झाली.
यानुसार, कार्गो वाहतूक दुप्पट होणार असताना मुंबईच्या बंदरात जहाजे उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे समुद्रात जहाजे नांगरणीच्या नव्या जागा विकसित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कार्गो हाताळणीत वाढ होताना त्यात इंधन कार्गोचा हिस्साही मोठा असेल. त्यामुळेच येत्या काळात पीर पाऊ व जवाहर द्वीप, या दोन्ही बेटांचा इंधन जहाज उभे करणे व त्यावरील साठवणूक क्षमतेसाठी पूर्ण वापर केला जाईल. त्याचवेळी प्रवासी क्रुझ हा मुंबई बंदर विकासातील महत्त्वाचा भाग असेल, असे या कार्यशाळेत ठरविण्यात आले.
याबाबत मुंबई बंदर प्राधिकरणाचे सहायक संचालक (धोरण व्यवस्थापन) सर्बोदमण मुखर्जी यांनी सांगितले, ‘मुंबईतील क्रुझ बोटींची संख्या वाढती असेल. मुंबई हे झपाट्याने क्रुझ पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येत आहे. त्यामुळेच पुढील काळात सध्याच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलची क्षमता पूर्ण होईल. त्या स्थितीत २०४७चा विचार केल्यास नवे क्रुझ टर्मिनल आगामी काळात उभे केले जाईल. त्या दृष्टीने धोरण आखले जात आहे.’
प्राधिकरणाने नॉर्वेची राजधानी ओस्लो व स्पेन येथील बार्सिलोना या दोन बंदर व्यवस्थापनांशी करार केला आहे. याअंतर्गत बोटी व त्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांचा समावेश आहे. त्याद्वारे आगामी काळात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल तर उभे होणार आहेच, त्याखेरीज भविष्यात आंतरमुंबई जलमार्गही तयार होतील. यासाठी आवश्यक त्या सर्व धक्क्यांचा युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारित हरित पद्धतीने विकास करण्यात येणार आहे.
चार क्षेत्रांवर लक्ष केंद्रित
मुंबई बंदर प्राधिकरणाने ‘व्हिजन २०४७’अंतर्गत मच्छिमार नौकांसाठी नव्या धक्क्यांचा विकास व त्याचे नियोजन, प्रवासी क्रुझ टर्मिनल, कार्गो जहाजांसाठी नव्या संरचना यावर लक्ष केंद्रित केले आहे. याखेरीज जहाजांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत जहाज दुरुस्ती केंद्रही सुरू करता येईल का, या दृष्टीनेही नियोजन सुरू केले आहे, हे विशेष.