बदलापुरातील ‘त्या’ शाळेची तोडफोड, १५०० जणांविरोधात गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: बदलापूर आंदोलनप्रकरणी तीन स्थानिक पोलिस ठाण्यासह रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण १५०० आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्तांनी बुधवारी ही माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या ३२ आंदोलकापैकी १० महिला आंदोलकांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले, तर २२ आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसाकडून इतर आंदोलकांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी शाळा उघडताच संतप्त नागरिक आणि पालकांनी शाळेवर धडक देऊन दगडफेक केली. मात्र, शाळा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेले नागरिक त्याच आवेशात बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले व रेल रोको करण्यात आला. सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत आंदोलकांनी आरोपीला सर्वांसमोर फाशी देण्याची मागणी लावून धरली होती. या दरम्यान आंदोलकांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. या प्रकरणी जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे, वाहनांचे; तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, शाळेची तोडफोड करणे, रेल रोको करणे यांसारख्या आरोपांचा ठपका ठेवून १५०० आंदोलकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सीसीटीव्ही आणि माध्यमांवर दिसलेल्या चेहऱ्यांवरून आंदोलकाची ओळख पटवून त्यांना अटक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आंदोलकांचे वकीलपत्र घेण्यासाठी अनेक वकील स्वत:हून पुढे आले आहेत. घडलेल्या घटनेचा तसेच या गंभीर घटनेचा गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी केलेल्या चालढकलपणाचा वकिलांनी निषेध केला.

पोलिस-वकिलांमध्ये बाचाबाची

रेल्वे पोलिसांकडून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आंदोलकाचे वकीलपत्र घेण्यासाठी पोहोचलेल्या वकिलांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आल्याने वकील आणि पोलिसांमध्ये वाद झाला. अटकेत असलेल्या आंदोलकाच्या सह्या घेण्यासाठी वकिलांना विरोध केल्याने वकील आक्रमक झाले. विरोध करणाऱ्या पोलिसांनी तत्परता दाखवत या घटनेप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला असता तर ही वेळ आलीच नसती, असा आरोप वकिलांनी केला. यामुळे कल्याण न्यायालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

Source link

Badlapur Crimebadlapur live news today in marathibadlapur parents protest liveBadlapur School Girls Sexual Assault Caseबदलापूर चिमुरडींवर बलात्कारबदलापूर लैंगिक अत्याचारबदलापूर शाळा मुली अत्याचारबदलापूर शाळा विद्यार्थिनी बलात्कारबदलापूर स्टेशन रेल रोको
Comments (0)
Add Comment