बदलापूर प्रकरणी कोर्टाचा संताप
‘महिला व मुलींविरोधातील गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहून योग्य तपास करण्याचे काम पोलिस हे लोकांनी आंदोलने केल्यानंतरच करणार आहेत का?’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एका प्रकरणाच्या निमित्ताने आणि बदलापूर आंदोलनाच्या संदर्भाने तीव्र संताप व्यक्त केला.
‘महिला व मुलींविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणांत पोलिसांकडून संदिग्ध स्वरुपाचा तपास करण्यात आला आणि तपासातील त्रुटींमुळे आरोपींना लाभ होण्याची शक्यता असल्याचे दिसणारी प्रकरणे आमच्यासमोर वारंवार येत आहेत. दररोज बलात्कार अथवा पोक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांची अशी चार ते पाच प्रकरणे सुनावणीस येत आहेत, ज्यात पोलिसांचा तपास सदोष असतो. अशा गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तुमच्याकडे विशेष प्रावीण्य असलेले अथवा महिला पोलिस अधिकारी नाहीत का? अशा प्रकरणांचा तपास कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे कशी सोपवली जातात? पोलिस विभाग अशा प्रकरणांबाबत गंभीर व संवेदनशीलता का दाखवत नाही? यापूर्वीही महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात त्रुटी ठेवल्या जात असल्याची चिंता व्यक्त केली होती.तरीही पुन्हा-पुन्हा आमच्यासमोर तीच गंभीर बाब वेगवेगळ्या प्रकरणांच्या निमित्ताने येत आहे’, असे न्या. अजय गडकरी व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने नमूद केले.