डॉक्टरांनी दिली लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती
‘मुंबई तक’ या वेबसाइटने चिमुकलीच्या पालकांशी संवाद साधला. यावेळी अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ‘मुंबई तक’ने दिलेल्या माहितीनुसार, मुलीला वेदना होत असल्याचं समजल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिची मेडिकल टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट २४ तासांनी १४ ऑगस्ट रोजी आला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. हे समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीचे रिपोर्ट घेऊन थेट शाळा गाठली. त्यांनी शाळेतील वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका यांना त्यांच्या मुलीवर शाळेतील कोणतरी लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट त्यांनी शाळेला दिला. यावर शाळेकडून आमच्या शाळेत असं होऊ शकत नाही, हे खोट आहे, मुलगी सायकलवरुन पडली असेल, असं म्हणत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत त्यांना शाळेतून बाहेर जाण्यास सांगितलं.
यावर पालकांनी शाळेला आमच्याकडे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत, तुम्ही नकार कसं देऊ शकतात असा सवाल केला. पालकांनी शिक्षकांना शाळेतील सीसीटीव्ही चेक करण्याचं सांगितलं, मात्र यावर शाळेकडून मागील १५ दिवसांपासून काही कामासाठी सीसीटीव्ही बंद असल्याचं सांगण्यात आलं. यावर पालकांना मोठा धक्का बसला. शाळेने त्यांच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना इतर कोणतंही सहकार्य केलं नाही.
मनसेच्या महिला कार्यकर्त्यामुळे तक्रार दाखल
शाळेकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. मात्र पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस असतानाही तिने पालकांची तक्रार नोंदवून घेतली नाही. पोलिसांनी तब्बल १२ तास त्या चिमुकलीसह तिच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं होतं. अखेर मुलीच्या पालकांनी शहरातील एका मनसेच्या कार्यकर्त्या महिलेला फोन करुन संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मनसेच्या त्या महिलेने पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतरही पोलीस तक्रार घेत नव्हते. नंतर मनसेच्या महिलेने वरिष्ठांना फोन केल्यानंतर पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली. रात्री १२च्या नंतर पोलिसांनी चिमुकलीवरील अत्याचाराची एफआयआर दाखल करुन घेतली.
पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाला…
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पालकांना तुम्हाला पुन्हा सरकारी रुग्णालयात मेडिकल टेस्ट करावी लागेल असं सांगितलं. १७ ऑगस्टला सकाळी ९ वाजता सरकारी रुग्णालयात येण्यास सांगितलं. मात्र ११.४५ वाजले तरी पोलीस तिथे पोहोचले नव्हते. पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. पुन्हा तिथे त्यांना बसवून ठेवण्यात आलं. त्यांना शिवीगाळ झाल्याचा आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे. तसंच महिला पोलीस ऑफिसर शाळेत जाऊन त्यांची शाळेतील काही लोकांसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचं कुटुंबाने सांगितलं. या गुप्त चर्चेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने बाहेर येत मुलीसोबत असं काही घडलं असल्याच्या गोष्टीला नकार दिल्याचं पालकांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या वागणुकीनंतर आता पोलीस प्रशासनावरुनही आपला विश्वास उडाला असल्याचं ते कुटुंब म्हणालं. आता त्यांना केवळ आपल्या मुलीसाठी न्याय हवा आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तसंच हे प्रकरण पहिलं नसून आरोपी अक्षय शिंदेने इतरही आणखी मुलींसोबत असं केलं असू शकतं असा आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी व्हावी असंही पीडित कुटुंबाने म्हटलं आहे. तसंच या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे आता एका आरोपीला फाशी झाली, तर पुढे दुसरा आरोपी अशी गोष्ट करणार नाही, त्यामुळे त्याला फाशीची मागणी चिमुकलीच्या कुटुंबाने केली आहे.
कुटुंबाचे पोलीस, शाळा प्रशासनावर आरोप
चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण बदलापूर शहर पेटून उठलं होतं. बदलापूरमधील जनतेने शाळेसमोर, रेल्वे ट्रॅकवर उतरुन तीव्र आंदोलन केलं. चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबाला तुम्ही या आंदोलनात सहभागी होयचं नसल्याचं सांगत धमकावलं असल्याचं पीडित कुटुंबाने सांगितलं. तसंच तुम्ही सहभागी झाल्यास हे आंदोलन तुम्हीच घडवून आणल्याचं समजून तुमच्या संपूर्ण कुटुंबावर एफआयआर दाखल केला जाईल अशी धमकी पोलिसांनी दिल्याचं कुटुंबाने म्हटलं आहे. आम्ही कोणालाही आंदोलन करण्यास बोलावलं नसून बदलापूरची जनता स्वत:हून आंदोलन करत असल्याचंही कुटुंबाने पोलिसांनी सांगितलं.
चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत
चिमुकल्या मुलीची आई गरोदर असून त्या या परिस्थितीनंतर आजारी आहेत. दुसरीकडे मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून ती कोणाशीही बोलत नाही, घरात कोणी आलं तरी ती दूर जात लपून बसत असल्याचं, तिच्या पालकांनी सांगितलं आहे. त्याशिवाय विविध डिपार्टमेंटचे लोक येऊन वारंवार एकच जबाब नोंदवून घेत आहेत, याचाही अतिशय त्रास होत असल्याचं पालकांनी सांगितलं. या प्रकरणात शाळेला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शाळेला पूर्ण मदत केल्याचाही आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर स्टाफ ज्यांनी तक्रार घेतली नाही, मदत केली नाही. त्यामुळे या सर्वांवरही एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणीही चिमुकलीच्या कुटुंबाने केली आहे.