महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप २ महिन्यांचा कालावधी असला तरी राज्यातील जनतेचा मूड काय आहे हे आता समोर आले आहे. आजतक या वृत्तवाहिनीने केलेल्या मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेमध्ये राज्यातील जनतेला काय वाटते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व्हेत राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आमदार यांच्या कामकाजावर लोकांनी मत व्यक्त केली आहेत.
मूड ऑफ नेशननुसार महायुती सरकारच्या कारभारावर २५ टक्के जनता पूर्णपणे समाधानी आहे. तर ३४ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर काही प्रमाणात समाधानी असल्याचे म्हटले आहे. मात्र ३४ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. यावरून राज्य सरकारच्या कामगिरीवर एकूण जनतेच्या मनात फार चांगले मत असल्याचे दिसत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर ३५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. ३१ टक्के लोकांनी काही प्रमाणात समाधान तर २८ टक्के लोकांनी नारजी व्यक्त केली आहे. राज्यातील खासदारांच्या कामगिरीवर ३२ टक्के समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तर २२ टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. आमदारांच्या कामगिरीवर २६ टक्के लोक समाधानी तर २७ टक्के लोकांनी असमाधन व्यक्त केले आहे.
राज्यातील महत्त्वाचा मुद्दा
या सर्व्हेमध्ये लोकांनी राज्यातील महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारी असल्याचे म्हटले आहे. ३२ टक्के लोकांच्या मते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर विकास कामे आणि महागाई याला १५ टक्के लोकांनी महत्त्वाचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न १३ टक्के लोकांना महत्त्वाचे वाटतात. कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्ट्राचार यासाठी अनुक्रमे २ आणि ४ टक्के महत्त्व दिले आहे.
पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत
राज्यातील जनतेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच पसंती दिली आहे. त्यांनी ४६ टक्के लोकांनी पाठिंबा दिलाय. तर राहुल गांधींना ३४ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
विरोधकांवर नाराजी
राज्यातील विरोधीपक्षात असलेले म्हणजेच महाविकास आघाडीतील पक्षांच्या कामगिरीवर ११ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर ३० टक्के लोकांना असमाधान व्यक्त केले आहे. यावरून विरोधकांनी अधिक चांगली कामगिरी करावी असे लोकांना वाटत असल्याचे या सर्व्हेतून दिसते.
मूड ऑफ नेशन सर्व्हे १५ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ या काळात करण्यात आला. ज्यात १ लाख ३६ हजार ४३६ लोकांची मते घेण्यात आली होती. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे घेण्यात आला होता.