आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला,अन् थेट तुरुंगात गेला;पोलीस कारवाईत वडिलांची ससेहोलपट

उल्हासनगर (प्रदिप भणगे) : चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय. भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससेहोलपट झाली आहे.

बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून त्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण हा आईची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथला दवाखान्यात यायला निघाला होता. मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळत सुटले. या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली. यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडले.

भूषण याने पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरांकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषण याचे वयस्कर वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे. भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती. भूषण याच्या एका मित्राने रात्री फोन करून आम्हाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे, हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं. अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे.
शिक्षकाने केला नववीतील विद्यार्थीनीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ दाखवून…, पुण्यातील दौंड तालुक्यातील घटना

भूषणच्या जामीनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते. मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही. भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे कापलेले आहेत. तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते. आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे.

दरम्यान, बदलापूर आंदोलनाप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील ऍड. सत्यन पिल्ले यांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधले काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज, क्लास यांचे आयकार्ड सापडले आहेत. काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडले आहेत. काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत. मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा ऍड. सत्यन पिल्ले यांनी केला आहे. या सगळ्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलना प्रकरणी पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Source link

Badlapur Newsbadlapur news todaypolice arrested innocent youth in badlapurprotesters in badlapurबदलापूर अत्याचार प्रकरणबदलापूर आंदोलनबदलापूर पोलीस लाठीचार्ज
Comments (0)
Add Comment