कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी नवीन चेहरा म्हणून काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिलेदाराचा काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. जयपूर येथे झालेल्या अधिवेशनात दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, असा ठराव झाला होता. त्या अनुषंगाने कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी दलित आणि आंबेडकरी चळवळीचा उमेदवार काँग्रेसने प्रवेश करून घेतला. त्यानुसार त्यांनी मतदारसंघात तयारीही सुरू केली आहे.
अविनाश साळवे असं त्या उमेदवाराचं नाव आहे. आरपीआय गवई गटाकडून दोन वेळा नगरसेवक आणि एकदा काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारीसोबत २०१७ मध्ये शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळवत ते चार टर्म पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यासोबत आंबेडकरी चळवळीचा दांडगा अनुभव साळवे यांना आहे. सोबत अविनाश साळवे यांनी दावा केला की आमच्या सोबत कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सगळेच नगरसेवक संपर्कात आहे.
अविनाश साळवे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्सने संपर्क साधला असता, ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असं आश्वासन देऊन पक्षप्रवेश करून घेतला. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मी महाविकास आघाडीचा घटक आहे. प्रवेश करत असताना मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना या बाबतची माहिती दिली आणि त्यांनीही मला उदार मनाने जाण्याची परवानगी दिली.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ
कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेस पक्षातून माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि त्यांचे वडील रमेश बागवे इच्छुक आहेत. रमेश बागवे गेले दोन टर्म पराभूत झाल्यानंतर जयपूर अधिवेशनाच्या ठरवनुसार रमेश बागवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे आंबेडकरी चळवळ आणि विचारातला उमेदवार गळाला लावून घेतला आहे. मात्र आता पुढे काय घडू शकतं हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असेल.