नवरंग

भारत सासणे

चित्रपटाचं माध्यम हे चांगल्या दिग्दर्शकाचं चांगलं असं निवेदन असू शकतं. निवेदनाबाबत ‌‘नवरंग‌’ आपल्याला काही सांगून जातो. अमूर्ततेबाबतचं भाष्य समजेल अशा भाषेत व आवश्यक त्या काव्यात्मकतेसह मांडणं या सिनेमातून शक्य झालं. ‌‘नवरंग‌’च्या एकूण अनुभवाच्या अवकाशात कोणाकोणाचा समावेश होता, त्याची यादी करावी लागेल. व्ही. शांताराम, ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, गीतकार म्हणून बहुधा बी. एम. व्यास आणि अर्थात संध्या व महिपाल यांची नावे यादीत जातात. अंतर्यामी कविता जगणाऱ्या कवीला व्यवहार जमत नसतो, तसा कथानायकालासुद्धा जमलेला नाही. मात्र, अंतर्यामीच्या प्रतिभादेवतेशी त्याचा संवाद सुरू आहे. त्याच्या साध्या-भोळ्या ग्रामीण पत्नीला अर्थातच कवी नवऱ्याच्या भावविश्वाचा पत्ता लागत नाही. ती स्वयंपाक करते आहे, कावली आहे, चुलीच्या धुरामुळे डोळे लाल झाले आहेत. आणि कसाबसा, थोड्या त्राग्याने स्वयंपाकघरात तिचा वावर सुरू आहे. कवी तिला पाहतो आहे आणि मग त्यांचं पाहणं म्हणजे कवीचं पाहणं होतं. त्रासलेल्या पत्नीच्या जागी त्याला आपल्या ‌‘मोहिनी‌’चं दर्शन घडत आहे. ही मोहिनी म्हणजे प्रतिभादेवताच. मग फुंकणीचं रूपांतर अलगुजात होतं आणि फुंकण्याचा आवाज संगीतात रूपांतरीत होतो. स्वयंपाकाच्या त्रासद प्रसंगाचं रूपांतर अद्भुत नृत्य-गायनात होतं. ‌‘संध्या‌’ नावाच्या नटीचा अद्भुत नृत्याविष्कार आपल्याला दिसतो. मोहिनी म्हणून कोण्या दुसऱ्याच स्त्रीबरोबर पतीचे काही संबंध असावेत, असा बिचाऱ्या पत्नीचा भाबडा समज होतो. ती निघून जातो आणि कवीच्या भावविश्वातून प्रतिभासुंदरीसुद्धा निघून जाते. मग सुरू होतो त्याचा आपल्याच कवितेचा शोध आणि भटकंती, परवड. अखेर ‌‘तू कुठे आहेस?‌’ या कवीच्या निर्वाणीच्या प्रश्नावर ‌‘प्रतिभादेवता मोहिनी‌’ भावविश्वात प्रकट होऊन त्याला सांगते की, ‌‘अरे वेड्या, मी तर तुझ्यातच, तुझ्या श्वासात लपलेली आहे, तेव्हा मला शोधण्यासाठी बाहेरची वणवण कशासाठी?‌’ पत्नीचाही गैरसमज दूर होतो.

चित्रपटभर रंगांची उधळण, अभिजात कवितेची उधळण, संगीत व नृत्याचा आढळ, कथाकल्पनेतील साधेपणा आणि तरीही घेतलेल्या अमूर्ततेचा शोध इत्यादीमुळे या चित्रपटाचा एकूणच भव्य असा अविस्मरणीय संस्कार होतो. अजूनही त्यातलं होळीचं गाणं, संध्याचं नृत्य, गणपतीचं हत्तीच्या रूपानं येऊन रंग उडवणं, नृत्यात भाग घेणं इत्यादी आठवलं, की मन उल्हसित होतं. चित्रकला, शिल्पकला, रंगकला, कविता, नृत्य, अभिनय इत्यादीचं असं तरल मिश्रण आपल्यासमोर येतं; तेव्हा हा चित्रपट नसून हा भव्य काव्यात्म अनुभव आहे, हे लक्षात येतं.

Source link

maharashtra times editorialmaharashtra times newssagun nirgun editorialमहाराष्ट्र टाइम्स बातम्यामहाराष्ट्र टाइम्स संपादकीयसगुण निर्गुण संपादकीय
Comments (0)
Add Comment