शाळेला १३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आबा बागूल यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुळे यांच्यासह माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अंकुश काकडे, कमल व्यवहारे, रामचंद्र ऊर्फ चंदू कदम आदी उपस्थित होते.
‘महाविकास आघाडी लवकरच राज्यात सत्तेवर येणार आहे आणि या मंचावर बसलेल्यांपैकी काही चेहरे आपल्याला मंत्रालयात दिसणार आहेत,’ अशी टिपण्णी खासदार सुप्रिया सुळे यांनी बागूल यांच्याकडे पाहत केली आणि मंचावर उपस्थित आबा बागुल यांची कळी खुलली. ‘राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवरच्या शाळा आम्ही संपूर्ण राज्यात उभारू,’ असेही सुळे म्हणाल्या.
‘महाराष्ट्राच्या आयर्न लेडी असलेल्या सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात,’ अशी इच्छा व्यक्त करीत भाषणाला सुरुवात करताना बागूल यांनी पर्वती मतदारसंघातून विधानसभा लढविण्याचा पुनरूच्चार केला. त्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडील हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे रदबदली करावी, अशी मागणीही बागूल यांनी केली. दरम्यान, या वेळी कार्यकर्त्यांनी आबा बागूल यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे हा अराजकीय कार्यक्रम राजकीय नाट्यानेच गाजला.
समाजकारणातून राजकारणात येऊन प्रभावी काम केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला यंदा पर्वतीतून विधानसभेची उमेदवारी आता मिळालीच पाहिजे. हा मतदारसंघ काँग्रेसला दिल्यास प्रस्थापितांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी स्वतः लक्ष घालून शरद पवारांशी बोलून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा.
– आबा बागूल