पार्थ पवार मतदारसंघात फिरत असतील पण… कर्जत-जामखेडकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचं मोठं विधान

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीसाठी मैदान तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आपल्या मुलांसाठी फिल्डींग लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांचे बारामतीसह कर्जत-जामखेड मध्येही दौरे वाढले आहेत. यावर आता आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘पार्थ आणि जय हे मोठे नेते आहेत ते कर्जत जामखेड मध्ये फिरतात का बारामतीमध्ये फिरतात हा त्यांचा निर्णय आहे. पण कर्जत-जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे. जनतेसाठी आणि विचारांसाठी मी भल्याभल्यांविरुद्ध लढायला तयार आहे.’

रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले पार्थ आणि जय दादांची मुलं आहेत, ते निर्णय घेतील त्यांच्या उमेदवारीबद्दल. पार्थ दादा आणि जय दिसत नसतील पण सक्रीय असतील. अजित दादा, पार्थ, जय हे मोठे नेते आहेत त्यांनी कुठे फिरायचं ते त्यांनी ठरवावं पण अजित पवारांचं काम मी जवळून बघितलं आहे. दादा लोकनेता होते भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी मी चिंता व्यक्त केली होत, ते आता होताना दिसत आहे त्याचं वाईट वाटतं.

‘जनतेसाठी भल्याभल्यांविरुद्ध लढायला तयार’

पार्थ आणि जय यांच्या सक्रियतेबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘पार्थ आणि जय हे मोठे नेते आहेत कर्जत जामखेड मध्ये फिरतात, का बारामती फिरतात हा त्यांचा निर्णय आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पण कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे. जनतेसाठी आणि विचारांसाठी मी भल्याभल्यांविरुद्ध लढायला तयार आहे.’

‘मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्याचं महायुतीत धाडस नाही’

मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते सर्व एकत्र येतील, येत्या काळात निर्णय होईलच. मविआमध्ये निवडणुकीबाबत आणि मुख्यमंत्री पदाबाबत उघड उघड चर्चा होते, तेवढं धाडस आमच्यात आहे. तशी महायुतीमध्ये ते धाडस नाहीच. महायुतीच्या नेत्यांमध्ये हे सांगण्याचं धाडस आहे का की देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार आहोत. तसं असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी उघड उघड सांगावं, अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे.

निवडणुका पुढे ढकलणे हा संविधानाला धोका

निवडणुका पुढे टाकण्याची भूमिका जर घेतली तर हा संविधानाला फार मोठा धोका आहे, असेही रोहित पवारांनी अधोरेखित केले. निवडणूका पुढे पुढे जात आहे याचा अर्थ एकच महायुती सर्वसामान्यांना घाबरली आहे. संविधान अभ्यासकांचं मत आहे की, १६ किंवा २६ तारखेच्या पुढे निवडणूका जाणार नाहीत. आम्हीही तशी आशा करतो, असेही पवार म्हणाले.

Source link

ajit pawarKarjat Jamkhed Vidhan SabhaMaharashtra politicsparth pawarRohit Pawarअजित पवारांची यात्राकर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघपार्थ पवारांचा कर्जत दौरामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकरोहित पवारांची प्रतिक्रिया
Comments (0)
Add Comment