वरळी विधानसेचे प्रतिनिधित्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून तयारी सुरू आहे. शिवसेना-मनसेत सध्या प्रचंड संघर्ष सुरू आहे. अशा स्थितीत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी यांनी लढावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मढवी यांच्या नावाने शुभेच्छुक म्हणून हे बॅनर झळकावले गेले आहेत.
अमोल मिटकरी यांच्या रुपाने वरळीत घड्याळवाला आमदार हवा, अशी इच्छा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. याआधी एकसंध राष्ट्रवादी असताना सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. शरद पवार यांनी त्यांना वरळीतून उमेदवारी दिली होती आणि निवडूनही आणले होते. एवढंच नव्हे तर त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिली होती.
मनसे-अमोल मिटकरी यांच्यात वाद
अमोल मिटकरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद उमटले होते. मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडून राज यांच्यावरील टीकेचे समाचार घेतला होता. शीर्षस्थ नेतृत्वाने टीका केलेली आम्ही सहन करू पण अमोल मिटकरी यांच्यासारख्या बाजारू विचारवंताने राज ठाकरेंवर केलेली टीका आम्ही सहन करू शकत नाही, असे मनसैनिकांचे म्हणणे होते. या सगळ्या राड्यानंतर मनसे तयारी करत असलेल्या वरळी मतदारसंघात अमोल मिटकरी यांचे आमदारकीच्या उमेदवारीसाठीचे बॅनर म्हणजे निव्वळ योगायोग आहे की खरंच काहीतरी राजकारण शिजतंय? हे येणारा काळच सांगेल!