shiv sangram president jyoti mete : . मराठा आरक्षणचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत 6 वेळा उपोषण केलं असून मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जरांगे पाटील करत आहेत. त्यामुळे आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील हे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
मराठा आरक्षण अधिसूचनेचे सरकारने काय केले?
ज्योती मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की, ”मराठा आरक्षण अधिसूचनेचे सरकारने काय केले? हे सांगितले नाही सर्व समाज घटकांना व कायदे तज्ञांना घेऊन सखोल चर्चा व्हायला हवी. शिवसंग्रामच्या माध्यमातून आम्ही राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघात तयारी करत आहोत. याबरोबरच शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावर लढा उभारला तशाच पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे देखील लढा देत आहेत. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. शिवसंग्राम बीड विधानसभेसाठी तयारी करत आहे. हे त्यांच्या निदर्शनास आलेच असेल त्यामुळे या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा करून आगामी वाटचाल निश्चित करण्यात येणार आहे”. असं ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.
शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट आहे
ज्योती मेटे पुढे म्हणाल्या की, ”मराठा आरक्षण प्रश्नावर शिवसंग्रामची भूमिका प्रारंभापासून स्पष्ट राहिलेली आहे. स्वर्गीय विनायक मेटे यांनी देखील या विषयावर लढा उभारलेला आहे. तोच लढा आम्ही देखील पुढे लढत आहोत. सरकारने जानेवारीमध्ये मराठा आरक्षणाविषयी अधिसूचना काढली होती त्याला निश्चित अशी कालमर्यादा देखील होती. परंतु या कालमर्यादेत सरकारने नेमके काय केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आरक्षणाविषयी संभ्रम सर्वांमध्येच आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेत तसेच कायदे तज्ञांच्या उपस्थितीत सखोल चर्चा होणे गरजेचे असल्याचे देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.