shiv sena mla disqualification : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टासह राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या 40 आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप झाला नसून संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टवर हल्लाबोल केला आहे.
तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावलं पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, ” शिवसेना पक्षात फुट पाडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी लढाई सुरू केली. शिवसेनेचे चिन्ह आणि 40 आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे. लढाई सुरू होऊन तीन वर्ष झाले आहेत तरी सुद्धा न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावलं पाहिजे. स्थापन झालेलं सरकार हे घटनाबाह्य आहे. हे कोर्टाला माहीत आहे. तरी सुद्धा निकाल दिला जात नाही. हा अंधा कानून आहे”. असं म्हणत संजय राऊत यांनी कोर्टावर टीका केली आहे.
चारशे पार झाले असते तर घटना जाळून टाकली असती
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” चारशे पार झाले असते तर या लोकांनी घटना जाळून टाकली असती. महाराष्ट्राने त्यांना ब्रेक दिला. मराठी माणसाच्या नादी लागू नका. तो एकतर पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. परंतु आता ठिणगी पडली असून त्याचा वणवा देशभरात पसरला आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले. परंतु आम्ही वाकलो नाही. जे लोक पळून गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लावू नये”. असं संजय राऊत म्हणाले आहेत.